
माझी कोणतीही औकात नाही. माझा कार्यक्रम फक्त 4 लोक पाहतात. त्यामुळे राजकीयदृष्ट्या मला दुर्लक्षित करणे चांगले! त्यामुळे कृपया मला दुर्लक्षित केले जाऊ शकते का, असा सणसणीत टोला कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना, कुणाल कामरासारख्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे केव्हाही चांगले, असे वक्तव्य केले होते. कुणाल कामराचा कोणताही दर्जा नाही. तुम्ही त्यांचा दर्जा वाढवता. आमचा पक्ष आणि आमच्या युतीमधील मित्रपक्षही थोडे भावनिक आहेत. आम्ही व्यावहारिक राजकारणी नाही. आम्हीही थोडे भावनिक आहोत आणि ही भावनाच आपल्याला थोडी प्रतिक्रिया देण्यास भाग पाडते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
असे आहे प्रकरण…
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विडंबन कवितेतून अप्रत्यक्षरीत्या ‘गद्दार’ असा उल्लेख केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाल्यानंतर 23 मार्च रोजी मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली होती.