मंत्रालयात कमांड कंट्रोल सेंटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याचा कारभार चालवल्या जाणाऱ्या मंत्रालयाला असलेला धोका लक्षात घेऊन मंत्रालयाच्या तळमजल्यावर पोलिसांनी अत्यंत अत्याधुनिक मंत्रालय कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले आहे. अत्याधुनिक इन्फ्रारेड कॅमेरे, ड्रोन, कॉम्प्युटर सिस्टम व आधुनिक संदेशवहन यंत्रणेच्या सहाय्याने कमांड कंट्रोल रूमच्या माध्यमातून या परिसरावर २४ तास देखरेख ठेवण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला या आधुनिक कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे.

अतिरेकी कारवायांचा वाढता धोका लक्षात घेऊन मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मंत्रालय व परिसरात सुमारे ४२२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून २४ तास या परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी मंत्रालयात खास कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले आहे. या कंट्रोल सेंटरमध्ये एलजी कंपनीचे अत्याधुनिक ४० इंच आकाराचे सहा मोठे टीव्ही स्क्रीन लावले आहेत. या स्क्रीनवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून टिपली जाणारी दृश्ये अतिशय सुस्पष्टपणे दिसतात. आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने अतिशय सूक्ष्म हालचालीही टिपल्या जातील. नाइट व्हिजन कॅमेऱयांच्या मदतीने रात्रीच्या वेळेस होणाऱया हालचालीही स्पष्टपणे दिसतील.

– या कॅमेऱ्यांच्या मदतीला चार ड्रोन कॅमेरेही तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी चार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कारगीलमध्ये ड्रोनच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱया एका लष्करी अधिकाऱयाची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. ही ड्रोन हवेत उडाल्यावर सलग ४० मिनिटे आकाशातून मंत्रालयाच्या परिसरावर लक्ष ठेवू शकतील. ४० मिनिटांनी बॅटरी संपल्यावर ड्रोन पुन्हा आपल्या मूळ जागी उतरेल अशी यंत्रणा आहे. त्यामुळे आकाशातूनही मंत्रालयाच्या परिसरावर लक्ष ठेवता येईल.