ट्रान्सजेंडरला नोकरीवरून काढले, 52 वर्षांनंतर कंपनीने मागितली माफी

1968 साली कॅलिफोर्निया येथील लिन कॉन्वे यांनी लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्यावर आयबीएम कंपनीने त्यांना नोकरीवरून काढले होते. या घटनेला तब्बल 52 वर्षे उलटल्यानंतर आयबीएम कंपनीला आपल्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी लिन कॉन्वे यांची माफी मागितली आहे. एवढेच नव्हे तर कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या कॉन्वे यांना कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कारही केला. कॉन्वे आता 82 वर्षांच्या आहेत.

समलैंगिक किंवा ट्रान्सजेंडरला नोकरीवरून काढता येणार नाही, असा निकाल काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा निकाल आल्यानंतर चार महिन्यांनी लिन कॉन्वे यांची आयबीएम कंपनीने माफी मागितली. नुकत्याच झालेल्या ट्रान्सजेंडर डेच्या दिवशी लिन कॉन्वे यांना कंपनीने पुरस्कारही दिला.

कॉन्वे यांनी कंपनीने आपल्याला कामावरून काढले म्हणून कधीच नाराजी व्यक्त केली नव्हती. मात्र माफीमुळे त्यांना निश्चितच चांगलं वाटलं असल्याचं त्यांच्या मैत्रिणीने सांगितले.

नोकरीवरून काढल्यावर कॉन्वे यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर पुन्हा स्वतः खंबीरपणे उभे राहत करियर घडवले. 1973 साली त्यांनी झेरॉक्स सेंटरमध्ये काम केले. तिथे कॉम्प्युटर चीप डिझाईन केली. 2000 साली त्यांनी लिंग ओळख या विषयाला वाहिलेली वेबसाईट सुरू केली.

आपली प्रतिक्रिया द्या