मतदानाचा फोटो सोशल मीडियावर टाकला, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी, लातूर

चाकूर तालुक्यातील मौजे हाडोळी येथे मतदान करताना फोटो काढून तो सोशल मिडीयावर टाकून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी एका व्यक्तिविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तळणी (ता. रेणापूर) येथील विद्याविकास विद्यालयालयाचे मुख्याध्यापक संजीव नारायण बंडे यांनी तक्रार दाखल केली. चाकूर तालुक्यातील हाडोळी येथील मतदान केंद्र क्रमांक 160 येथे मतदान केंद्राध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक होती. 18 एप्रिल रोजी मतदाना दिवशी हाडोळी येथील मतदार संग्राम अंगद बडे याने त्याचे स्वतःचे मतदान करतेवेळी छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलमधून ते छायाचित्र सोशल मीडियावर टाकले. गोपनीयतेचा भंग करण्याच्या आरोपावरून संगाम बंडे याच्याविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.