केंद्र सरकारची माघार,अरावली पर्वतरांगांत नवे खाणकाम बंद

अरावली पर्वतरांगांच्या क्षेत्रात नव्या खाणकामावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणवाद्यांच्या व राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधानंतर एक पाऊल मागे घेत केंद्र सरकारने आज हा निर्णय घेतला.

जगातील सर्वात प्राचीन असलेल्या अरावली पर्वतरांगा दिल्ली, हरयाणा, राजस्थान व गुजरातमधून जातात. या पर्वतीय प्रदेशात बेकायदा बांधकाम होत असल्याच्या अनेक तक्रारी आधीपासूनच आहेत. त्यातच केंद्र सरकारने अलीकडे अरावली टेकडय़ा आणि पर्वतरांगांची नवी व्याख्या केली होती. या व्याख्येमुळे राजस्थानातील 90 टक्के टेकडय़ा अरावलीच्या पर्वतरांगा ठरत नव्हत्या. तिथे खाणकाम व बांधकाम सुरू होण्याचा धोका होता. पर्यावरणवादी व विरोधी पक्षांनी यावरून सरकारला घेरले. या दबावानंतर सरकारने तत्काळ माघार घेतली आहे. सरकारने नव्या खाणकामावर बंदी घातली आहे. तसेच जुन्या खाणींच्या कामावर बारीक लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्या खाणी त्वरित बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसे आदेश संबंधित राज्यांना देण्यात आले आहेत.

केंद्राची नवी व्याख्या काय?

केंद्र सरकारने केलेल्या नव्या व्याख्येनुसार, केवळ 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या टेकडय़ा अरावली पर्वतरांगांचा भाग मानल्या जातील. तसेच दोन टेकडय़ांमधील अंतर 500 मीटरपेक्षा कमी असेल तर ती एकच पर्वतरांग मानली जाईल, असे पेंद्राने म्हटले होते.