नालेसफाई, वृक्ष छाटणी तातडीने पूर्ण करा! एफ-दक्षिण कार्यालयात मान्सूनपूर्व बैठकीत शिवसेनेची मागणी  

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परळ, लालबाग, शिवडी, भोईवाडा, काळाचौकी, करी रोड, चिंचपोकळी या एफ-दक्षिण विभागात येणाऱया परिसरातील नालेसफाई, धोकादायक झाडांची छाटणी, सखल भागांत पाणी साचू नये यासाठीच्या उपाययोजना तसेच कचरा, डेब्रिज यासह मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना गटनेते आमदार अजय चौधरी यांनी एफ-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह पालिका अधिकाऱयांबरोबर आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केली.

मुंबईत पावसाळय़ात अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचते. काही वेळा हे सखल भाग रेल्वे लाईनच्या जवळ असल्यास त्यामुळे रस्ते आणि लोकल वाहतूकही ठप्प होते. मोठय़ा आणि छोटय़ा नाल्यांची नीट सफाई झाली नसेल आणि त्यात तरंगता कचरा पडलेला असेल तर अतिवृष्टीत नाल्यातील पाणी आजूबाजूच्या वस्तीत शिरून त्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. धोकादायक झाडे पडून काही जण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागात येणाऱया परिसरांची बारकाईने पाहणी करून या विभागातील नीट न झालेल्या कामांची तसेच नालेसफाई, धोकादायक झाडे-फांद्या, कचरा, डेब्रिज आणि इतर समस्यांची छायाचित्रे थेट सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याकडे गटनेते अजय चौधरी यांनी सोपवली. पावसाळा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असल्यामुळे तातडीने ही कामे मार्गी लावा, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली. बैठकीला माजी नगरसेवक सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव, सर्व पुरुष-महिला शाखाप्रमुख, शिवडी विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते.