
पूर्ण वाताहत झालेल्या आणि ठिकठिकाणी पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे वाडावासीयांचे कंबरडे मोडणाऱ्या भिवंडी-वाडा महामार्गाचे ठेकेदाराने थांबवलेले काम शिवसेनेच्या दणक्यामुळे पुन्हा सुरू झाले आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा शिवसेनेने देताच तहसीलदारांनी तातडीची बैठक बोलावून सामोपचाराने तोडगा काढला. तसेच या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करावे, असे आदेश दिल्याने शिवसेनेने पुकारलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
भिवंडी-वाडा महामार्गाच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. त्यातच या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने बिले न मिळाल्याने गेल्या आठवड्यापासून काम बंद केले होते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी वाडा-भिवंडी महामार्गावर कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. या आंदोल नाला काँग्रेस आणि मनसेनेही पाठिंबा दिला. या बैठकीत शिवसेना सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील, काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, शिवसेनेचे कांतीलाल देशमुख, प्रकाश केणे, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, मनसेच्या तालुका अध्यक्षा कांती ठाकरे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद घोलप, तालुका सचिव सागर भोईर, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पातकर,महिला आघाडीच्या नैना चौधरी, वर्षा गोळे, बेबी पाटील त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पोपट चव्हाण, अजय जाधव, संजय डोंगरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
काम तातडीने सुरू करण्याचे आदेश
वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बैठकीचे निमंत्रण दिले. यावेळी झालेल्या चर्चेत ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.