
मुंबईतील पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली असून काँक्रीट ओतण्याची कामे 20 मेपर्यंत पूर्ण करावीत. येत्या पंधरवडय़ात पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीटच्या (पीक्यूसी) कामांची गती वाढवावी. पीक्यूसी झाल्यानंतर रस्त्याच्या दीर्घायुष्यासाठी कटिंग करणे ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यानुसार कटिंग मशीनची संख्या आणि मनुष्यबळ वाढवावे, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामांची अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सांताक्रूझ (पश्चिम) येथील सेंट्रल एवेन्यू मार्ग, अंधेरी (पश्चिम) येथील मॉडेल टाऊन मार्ग, मालाड (पश्चिम) येथील ओरलेम चर्चसमोरील मार्वे मार्ग, बोरिवली (पश्चिम) येथील महाराष्ट्र नगर, जुने महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड वसाहत मार्ग आणि शिंपोली चौक ते महावीर चौक जोडरस्ता, कांदिवली (पूर्व) येथील समतानगर मार्गाचा यात समावेश आहे.
लोखंडी जाळय़ांऐवजी फायबरच्या जाळय़ा बसवा
पावसाळय़ात पाणी वाहून नेणाऱया चेंबर्सच्या लोखंडी जाळय़ांची चोरी दारूडे, चरशी, गर्दुल्ले करतात. त्यामुळे चेंबर्सवर लोखंडी जाळय़ांऐवजी फायबर रिइर्न्फोस्ड् पॉलिमर (एफआरपी) जाळय़ांचा वापर करता येणे शक्य आहे का, याची पडताळणी करावी. चांगल्या मानकाच्या एफआरपी जाळय़ा वापरल्या तर त्या दीर्घकाळ टिकतात. या जाळय़ा वजनाने जड असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहातदेखील स्थिर राहतात, अशी सूचना अभिजीत बांगर यांनी केली.