उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीतील घोळाकडे लक्ष वेधत शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मतमोजणीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाले असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे कुठलेही पुरावे नष्ट करू नका, अशी विनंती अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
मिंधे गटाचे रवींद्र वायकर हे उत्तर-पश्चिम मतदारसंघात 48 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी घोषित केले. आधी सलग मतमोजणी केल्यानंतर अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केले होते, मात्र काही काळ मतमोजणी थांबवून पुन्हा मतमोजणी घेतली व आकडेवारीत फरक दाखवला. त्यामुळे रवींद्र वायकर यांचा विजय निकाल जाहीर झाल्यापासूनच वादात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल कीर्तिकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. निवडणूक निकालाच्या प्रक्रियेतील सर्व फॉर्म्स, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, मायक्रोप्रोसेसर, ईव्हीएमशी संलग्न सॉफ्टवेअर लोडिंग युनिट आदींशी संबंधित सर्व पुरावे ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्यात यावेत, निकाल व मतमोजणीशी संबंधित कुठलाही पुरावा नष्ट करू नये. तसेच निकालाशी संबंधित युनिट्सची आमच्या उपस्थितीत पडताळणी करावी, अशी विनंती मुख्य निवडणूक आयुक्तांना केली आहे.
ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा दावा
सर्वोच्च न्यायालयाने ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स विरुद्ध निवडणूक आयोग’ या प्रकरणात दिलेल्या निकालाकडे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मतमोजणी सुरू असताना ईव्हीएममध्ये छेडछाड केली गेल्याचा दावा अमोल कीर्तिकर यांनी केला आहे.