हिंदी सक्तीमागे भाजपचा हिंदुराष्ट्रचा छुपा अजेंडा; काँग्रेसची टीका

भाजपच्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यामुळे राजकारण तापले आहे. सक्तीच्या हिंदीला सर्वच राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. सक्तीच्या हिंदीमागे भाजपचे छुपे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामागे हिंदू, हिंदुराष्ट्र, असा भाजपा छुपा अजेंडा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इयत्ता पाचवीपासून हिंदी व पुढे संस्कृत व नंतर अन्य भाषांचा अभ्यास करता येत असतानाही ही सक्ती कशासाठी? असा सवाल सपकाळ यांनी केला केला.

इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय अभ्यासक्रमात आहेच. त्यानंतर इयत्ता आठवीपासून संस्कृत विषयही आहे. त्यापुढे अन्य भाषांचा, इतकेच काय; पण परदेशी भाषांचाही अभ्यास करता येतो. मग इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा सक्ती करण्याचे धोरण कशासाठी? असा प्रश्न आहे.तसेच यामुळे शालेय विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा बोजा वाढणार आहे, याचा विचारही करण्यात आलेला नाही. त्यामुळे हिंदींची सक्ती अयोग्य आहे.

लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी मुळात 6 वर्षांपर्यंत मुलांना कसलाही शालेय अभ्यास, परीक्षा देऊ नये, असे म्हटलेले आहे. असे असताना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मुलांना केजी, सिनिअर केजी करायला लावले जाते. हा निव्वळ व्यवसाय झाला आहे. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास, अभ्यास करण्याची क्षमता येण्यास वयाच्या 6 व्या वर्षानंतर समज येते. त्यानंतरच शालेय विषय सुरू व्हावेत, असे आहे. त्यात अशी सक्ती करणे व तीसुद्धा भाषा विषयाची, हे योग्य तर नाहीच, शिवाय अशास्त्रीयच आहे, असे ते म्हणाले.