प्रचारात विखेंचे नाव, फोटो वापरू नका; कारवाईचा निर्णय काँग्रेस ‘हायकमांड’ घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय काँग्रेस ‘हायकमांड’ घेतील. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारात विखे यांच्या छायाचित्राचा अथवा नावाचा वापर करू नका, अशी सूचना प्रदेश काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली आहे.

राधाकृष्ण विखेंकडून पुत्राचा प्रचार सुरू, आघाडीच्या उमेदवारावर डागली तोफ

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याऐवजी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. आघाडी धर्माचे पालन न करता विखे हे मुलगा डॉ. सुजय यांच्यासाठी प्रचार करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना पाठवले होते. सदर पत्राला प्रदेश काँग्रेसने उत्तर दिले आहे. विखे यांच्यासंदर्भात कारवाई करण्याबाबत राष्ट्रवादीने पाठविलेले पत्र काँग्रेस हायकमांडला धाडण्यात आले आहे.

काँग्रेसला धक्का, राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

विखे यांच्याबाबतच्या निर्णय काँग्रेस हायकमांड दिल्लीतून घेणार आहे. तोपर्यंत विखे यांच्या फोटोचा अथवा नावाचा आघाडीच्या निवडणूक प्रचारपत्रात पोस्टर्स, अथवा इतर कोणत्याही प्रचार साहित्यात व प्रचारात वापर करू नका अशा स्पष्ट सूचना प्रदेश काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, राधाकृष्ण विखे हे 12 एप्रिल रोजी नगर येथे होणाऱ्या सभेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तथापि याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका विखेंकडून जाहीर करण्यात आलेली नाही. विखेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाकडे राष्ट्रवादीचे लक्ष लागले असून ते भाजपात प्रवेश करणार आहेत की या केवळ अफवा आहेत याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.