Operation Sindoor चा राजकीय फायदा घेण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न; काँग्रेसचा केंद्रावर निशाणा

ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ऑपरेशन सिंदूरचा राजकीय फायदा घेण्यासाठी पंतप्रधानांनी 25 मे रोजी फक्त एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. जयराम रमेश यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले.

पाकिस्तान सरकार भारताविरोधात खोट्या बातम्या पसरवत आहे. यामुळे भारतातील विविध राजकीय पक्षांचे नेते परदेशात जाऊन भारताची बाजू मांडतील, अशी केंद्र सरकारने योजना आखली आहे. यावर काँग्रेस निश्चितच आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचा भाग असेल, असा विश्वास जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईदरम्यान सर्व पक्षांनी एकतेचे आवाहन केले असतानाही पंतप्रधान मोदी आणि भाजप काँग्रेसला सतत बदनाम करत आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. पंतप्रधानांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास सहमती दर्शविली नाही. मात्र अचानक त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात एक शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

काँग्रेस नेहमीच राष्ट्रीय हित पाहते आणि भाजपप्रमाणे या मुद्द्यांचे राजकारण करत नाही, त्यामुळे काँग्रेस निश्चितच या शिष्टमंडळांचा भाग असेल, असेही जयराम रमेश पुढे म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते.