बदलापूर प्रकरणात चौकशी समितीने नोंदवलेले निष्कर्ष गंभीर, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

बदलापूर घटनेच्या चौकशी समितीनी जे निष्कर्ष नोंदवले आहेत ते गंभीर आहेत असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच कायद्याचे राज्य उरलेले नसून हे चोर, डाकू आणि लुटारुंचे झाले आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले की, बदलापूर प्रकरणात प्रशासनाने 48 तास कुठलीही कारवाई केलेली नाही. डॉक्टरांनी मुलींची तपासणी करण्यासाठी 12 तास लावले. समितीने नोंदवलेल्या निष्कर्ष गंभीर आहेत. राज्य कुठे चालले हा प्रश्न पडतोय.

वडेट्टीवार म्हणाले अहवाल आल्यानंतर यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे. आम्ही बंद मागे घेतला असून आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. अशा नराधमांना सहकार्य करणाऱ्या सरकारला जनता निवडणुकीत आपली जागा दाखवेल. हे राज्य कायद्याचे राहिले नसून हे लुटारू, चोर आणि डाकूंचे राज्य झाले आहे. लोकसभा निवडणुकीत 70-80 कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर कोण कारवाई करणार? सत्ता मिळवण्यासाठी हे पैसे खर्च केले आहेत. राज्य उद्ध्वस्त केले आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच भ्रष्टाचारासाठी या लोकांनी राज्य विकले आहे. 15 वर्षात जेवढी कंत्राटं काढली गेली नाही तेवढी कंत्राटं गेल्या दोन वर्षांत काढली गेली आहेत. महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च दरम्यान 2हजार 141 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. देशात सर्वाधिक महिलांवर अत्याचार महाराष्ट्रात घडत आहेत असेही वडेट्टीवार म्हणाले.