लाडक्या बहिणीचा इव्हेंट झाला असेल तर शेतकऱ्याकडे लक्ष द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी

मराठवाड्यात तुफान पाऊस झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे लाडक्या बहिण योजनेचा इव्हेंट झाला असेल तर शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अशी मागणी काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, मराठवाड्यात मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. आज तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. महायुती सरकारने वेळेचं गांभीर्य बघून आता इव्हेंट मोड मधून बाहेर पडावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी.

कापसाला हेक्टरी ५०,०००, सोयाबीन पिकाला हेक्टरी २५,००० मदत मिळाली तरच शेतकरी या संकटातून बाहेर निघू शकतो असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने हात आखडता घेऊ नये. जिथे सत्ताधारी सरकारी जमिनी विकून मंत्र्यांच्या आणि बिल्डरांच्या घश्यात कवडीमोलाने जमिनी देत आहे, तिथे शेतकऱ्यांसाठी सरकारने तिजोरीकडे बघू नये असेही वडेट्टीवार म्हणाले.