
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘कोल्हापूर कस्सं तुम्ही म्हणशीला तस्सं’ या टॅगलाइनद्वारे नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन लोकसहभागातून तयार केलेला जाहीरनामा आज ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात प्रसिद्ध करण्यात आला. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 350वा जन्मोत्सव विशेष वर्षानिमित्त हा जाहीरनामा त्यांना अर्पण करण्यात आला आहे.
कोल्हापुरात महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत केएमटी प्रवास, आरोग्य कवच, शाळांचे आधुनिकीकरण, महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करून उत्तम रस्ते, जयप्रभा स्टुडिओ आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांचा समावेश असलेला हा जाहीरनामा कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला.
काय आहे जाहीरनाम्यात?
कोल्हापूर शहरातील सर्व महिला आणि विद्यार्थ्यांना केएमटी बसने मोफत प्रवास, दोन लाख 60 हजार महिलांना आरोग्य कवच, फिरते पिंक स्वच्छतागृह, महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ, महिला सुरक्षिततेसाठी एसओएस बटन, सुरक्षित पाळणाघरे, कौशल्य प्रशिक्षण पिंक बस.
शिक्षणाच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर, स्मार्ट शाळा, डिजिटल अभ्यासिका, शाळांमध्ये पौष्टिक आहार, शाळाइमारती आणि खेळांचे सुसज्ज मैदान, महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती, फिरते वाचनालय यावर भर.
आरोग्य सुविधांमध्ये अतिगंभीर आजारावर वैद्यकीय उपचारासाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत, रक्तपेढीचे आधुनिकीकरण, नवीन रुग्णवाहिका, नवीन फिजिओथेरपी व डायलिसिस सेंटर, आयुष्यमान आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, महापालिका रुग्णालयांचे आधुनिकीकरण.
शहरी पायाभूत सुविधा अंतर्गत जुन्या इमारती व ऐतिहासिक वारसा याचे जतन, उत्तम दर्जाचे रस्ते, महापालिकेची नवीन भव्य प्रशासकीय इमारत, अर्बन स्ट्रीट डिझाईन, पूररेषेचे काटेकोर पालन, उद्यानांचा कायापालट, शहरांतर्गत उड्डाणपूल, 24 तास शुद्ध पाणी, यांसह मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, शहराची हद्दवाढ, ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ, श्रीअंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, विमानसेवा आणि रेल्वे, प्राणिसंग्रहालय तसेच कोल्हापूर विमानतळ नामकरण या सर्व बाबींसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे.
पारदर्शक कारभारासह आधुनिकीकरणावर भर
पारदर्शक कारभारासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभार, डिजिटल तक्रार निवारण, आवश्यक सेवा घरपोच, गुंतवणुकीसाठी एक खिडकी योजना, सिंगल विंडो बांधकाम परवाने, पेपरलेस गव्हर्नन्स, महानगरपालिका सोशल मीडिया हँडल, कोल्हापूर संवाद असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.





























































