
ज्या शिवसेने विरोधात आम्ही निवडणूक लढविली. पराभव केला. त्याच हक्काच्या जागेत लढण्याचा त्यांचा अधिकार असतानाही या पोटनिवडणुकीत त्यांनी समजून घेतले. काँग्रेसकडून प्रस्ताव समोर येताच, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहिले. त्यामुळे पक्ष, मैत्री, वचन आणि शब्द काय असतो हे फक्त शिवसेनेकडूनच शिकावे अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी शिवसेनेविषयी गोरवोद्गार काढून आपली कृतज्ञता व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित दसरा चौक येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या युवा मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, आज हा देश विकायला काढला. तोच देश काँग्रेसने उभा केला आहे, यांची जाणीव करून देत, त्यांनी भाजपच्या वापरा आणि सोडा प्रवृत्तीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, युवासेनेचे वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते.
आमदार धीरज देशमुख म्हणाले, विरोधात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी निवडणूक लढविली. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यांनी समजून घेतले. या पोटनिवडणुकीसाठी त्यांनीही शिवसेना पक्षप्रमुखांकडे मागणी केली. साहेब ही आपल्या हक्काची जागा आहे. ही जागा आपल्यासाठी असावी. त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी या जागेसाठी त्यांच्या पक्षप्रमुखांकडे मागणी करावी. तसा प्रस्ताव ठेवावा. हा त्यांचा अधिकार आहे. त्याचे आपण स्वागतच करतो. पण ज्यावेळी काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्याकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आला. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे एका शब्दात सांगितले की, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपण जयश्री जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. हे शिकले पाहिजे, असं यावेळी आमदार देशमुख म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून ते आजतागायत त्यांच्या विरोधात रस्त्यावर, गल्लीत विकासाच्या मुद्द्यावर लढलो. प्रत्येक निवडणुकीवेळी आमने-सामने चार चार हात झाले असतील, कधी आमची संख्या कमी तर कधी त्यांची संख्या जास्त असेल. पण मनामध्ये कधी मनभेद नव्हता. ही विचारांची, विकासाची, लोकांचे प्रश्न सोडविण्याची लढाई आहे. जनतेचा विकास आणि स्वप्नपूर्तीसाठी शिवसैनिक जनतेचे प्रश्न सोडवितात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही जनतेच्या प्रश्नांशी लढत असल्याचे आमदार धीरज देशमुख म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूरच्या मातीची संस्कृती जपण्यासह भाजपला त्यांची जागा दाखविण्याची आता आपली जबाबदारी आहे. आम्ही जनतेच्या विकासाचा प्रश्न होता म्हणून महाराष्ट्रात एकत्र आलो आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी दिशा देण्याचे काम आपण केले आहे. कोरोना काळात सुद्धा आम्ही तळागाळापर्यंत पोहोचून त्यांना संकटातून बाहेर काढण्याबाबत प्रयत्न केले. आम्ही निवडणुकीपूर्वी जे काही बोलून दाखवले ते करून दाखवल्याचे सांगून, गोव्यात विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात आपण जल्लोष करता. पण कोल्हापुरात निवडून येऊन दाखवा मग बोलू,अशा शब्दात त्यांनी भाजपला आव्हान दिले. तसेच काश्मीर फाईल्सचे सांगता तसे गोध्रा फाईल्सचे काय? शेतकरी फाईल्सचे काय? असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
रोजगार तसेच युवकांच्या समस्यां सोडविण्याच्या विषयाऐवजी वयक्तिक पातळीवर होणारी टीका, महिलांविषयी अवमानकारक भाष्य तुमची विचारसरणी दाखवून देते. लोकराजा छत्रपती शाहूंच्या समतेच्या या भूमीत हे न पटण्यासारखे आहेत. कोल्हापूरकर कधीही सुधारणार नाही,असे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्यही पटत नसल्याचे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले.
तर एकीकडे ज्या करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई ची पूजा करता, तिकडे घरच्या लक्ष्मीची विटंबना करता असा सवाल करत, ऊसतोड, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन कोणीही असो आम्ही महिला तुमच्या नाकावर टिच्चून स्वतःच्या पायावर उभे राहून काम करणार असे ठणकावत आमदार प्रणिती शिंदे यांनी महिलांविषयी वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य करणारे आणि त्यास पाठीशी घालणाऱ्या भाजप नेत्यांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला.
पाहा व्हिडीओ –































































