राम मंदिर, शेतकरी कर्जमाफी, धनगर आरक्षण सर्व थापाच; हे थापाड्यांचं सरकार!

28

सामना प्रतिनिधी । मुखेड

केंद्रातील व राज्यातील सरकार हे खोटे आश्वासन देवून शेतकरी, कष्टकरी जनतेला दिलासा न देता वेठीस धरण्याचे काम हे सरकार करीत आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची बाब असो की राम मंदिर मुद्दा असो कि शेतकऱ्यांची कर्जमाफी असो सर्वच बाबींवर थापा मारुन जनतेला फसवणारे थापाड्यांचे फसवणीस सरकार असल्याची टीका जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली.

राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकुन महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीने जन संघर्ष यात्रा सुरू असून, गुरुवारी मुखेडात सदर संघर्ष यात्रेचे भव्य जाहीर सभाद्वारे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले आहे. यावेळी जांब बु. ते मुखेड- एकलारा दरम्यान दुचाकी रॅली काढण्यात आली. या संघर्ष यात्रेची रॅली जाहीर सभेत रूपांतरीत झाली. यावेळी मंचावर माजीमंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, बस्वराज पाटील यासह अन्य नेते उपस्थित होते.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, देशात निवडणुकीच्या अगोदर मंदिर-मस्जिदीचा प्रश्न पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यासाठी आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार असल्याचा निर्धार केला. अशोकराव चव्हाण यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका करुन रस्त्यात ‘खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजत नसून या खड्यामुळे राज्यात आठशे जणांचा जीव गेला आहे, तेंव्हा भाजपाला खड्ड्यात गाडा’, असे आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या