#RajyaSabha Cash: मूळ प्रश्नावरून लक्षं हटवण्याची भाजपची रणनीती! जयराम रमेश यांचा प्रतिहल्ला

अदानी समूहावरील आरोपांची जेपीसी चौकशी करण्याच्या मागणीसाठी संसदेत आणि संसदेबाहेर ‘इंडिया’ आघाडीने रान उठवलेले आहे. याची चर्चा देशभरात होत असल्यानं केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. सरकारची प्रतिमा डागाळत असल्यानं सरकार बिथरलं आहे. याच दरम्यान, राज्यसभेत शुक्रवारी अचानक काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली 500 च्या नोटांचे बंडल सापडल्याने गोंधळ उडाला. सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे म्हणत चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सणसणीत उत्तर देतानाच भाजपवर मूळ प्रश्नांवरून लक्ष्य हटवण्याचे आरोप केले आहेत.

‘ही भाजपची रणनीती आहे, मुख्य प्रश्नांवरून लक्षं हटवण्याचे डावपेच आहेत. आम्ही जे मुद्दे मांडत आहोत, शेतकऱ्यांचे प्रश्न, सभापतींनीच ते मांडले आहेत आणि असे अनेक मोठे मुद्दे आहेत. आम्हाला मोदानी (Modi-Adani) घोटाळ्यातील लाचखोरीच्या आरोपांवर चर्चा हवी आहे. त्यामुळे यावरून लक्ष हटवण्यासाठी ते नवनवीन मुद्दे उपस्थित करत आहेत’, असा प्रतिहल्ला जयराम रमेश यांनी केला आहे.

या पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की’मी पहिल्यांदा पाहिलं की आज भाजपचे खासदार अधिवेशन तहकूब करायला खूप उत्सुक होते… मोदानी घोटाळ्यावर चर्चा व्हावी अशी आमची लोकसभेत मागणी आहे, लोकसभा तहकूब होत आहे. तुम्ही लोकसभा चालू देणार नाही, आम्ही राज्यसभा चालू देणार नाही, ही सरकारची रणनीती आहे. सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही सगळे सदस्य सहकार्य करत आहोत… सरकारला राज्यसभेत चर्चा नको आहे…’ असा आरोप देखील जयराम रमेश यांनी केला आहे.

संसदेत जाताना माझ्याकडे फक्त पाचशेची नोट असते, ते नोटांचं बंडल माझं नाही; अभिषेक मनु सिंघवींनी आरोप फेटाळले