
तिरुवनंतपुरम येथून काँग्रेससह विविध पक्षांच्या खासदारांना घेऊन दिल्लीकडे येणाऱया एआय-2455 या एअर इंडियाच्या विमानाचे रविवारी रात्री उशिरा आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आणि खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे विमान कंपनीने म्हटले आहे. यावेळी धावपट्टीवर दुसरे विमान उभे होते. त्यामुळे वैमानिकाने दुसऱयांदा उड्डाण घेऊन विमान पुन्हा सुरक्षित उतरवले.
एअर ट्रफिक ट्रकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 अंतर्गत विमानाने रात्री 8 वाजून 17 मिनिटांनी उड्डाण घेतले. हे विमान 10 वाजून 55 मिनिटांनी दिल्लीला पोहोचले होते. यावेळी विमानात काँग्रेस खासदार वेणुगोपाल होते. त्यांनी ‘एक्स’वरून नेमके काय घडले याबाबतची माहिती दिली. विमानात अनेक खासदार आणि इतर प्रवासी होते. तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे विमान उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र धावपट्टीवर आधीच एक विमान उभे होते. त्यामुळे वैमानिकाने विमानाचे पुन्हा उड्डाण केले आणि दुसऱया प्रयत्नात विमानाचे सुरक्षित लॅण्डिंग केले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
काँग्रेसची डीजीसीएकडे चौकशीची मागणी
धावपट्टीवर दुसरे विमान नव्हते असे एअर इंडिया प्रशासनाने म्हटले आहे, परंतु एअर इंडिया खोटे बोलत असून वैमानिकाने स्वतः अनाऊसमेंट करून धावपट्टीवर आणखी एक विमान उभे होते, अशी माहिती दिली. त्यामुळे आता याप्रकरणी डीजीसीएकडे तक्रार करणार असल्याचेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान साधल्यामुळे आम्हा सर्वांचे प्राण वाचले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वेणुगोपाल यांनी केली आहे.