संधी देऊन महाराष्ट्राने चूक केली का? प्रफुल पटेल यांनी सुनावले

praful-patel-ncp

मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करतात. या लोकांना तिथे आपलं घर निर्माण करून वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीय का, असा संतप्त सवाल करत राज्यसभेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अप्रत्यक्षपणे कंगना वाद आणि कोरोनासंदर्भातील आरोप-प्रत्यारोपांबाबत मोदी सरकारला सुनावले.

महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास मुंबई, पुणे, ठाणे या मोठय़ा शहरांमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. या शहरांनी चूक केली आहे का? संपूर्ण देशातील लोकांना तिथे घर निर्माण करण्याची संधी देऊन त्यांच्यावर टीका होणार का? आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का? अशा शब्दांत महाराष्ट्र आणि मुंबईला नावे ठेवणाऱयांचा प्रफुल्ल पटेल यांनी समाचार घेतला.

कोरोना महामारी हे देशातीलच नाही तर जगातील एक मोठे संकट आहे. कोरोनाविरोधी लढाईची सुरुवात केंद्राच्या आदेशाचे पालन करतच सर्व राज्यांनी केली आहे. आता अनलॉक प्रक्रियादेखील केंद्रीय गृहमंत्रालयाकडून येणाऱया गाईडन्सनुसारच होत आहे. जर आपण सर्वजण एकत्र लढत आहोत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज नाही, असे पटेल यांनी सांगितले.

कोरोनाविरोधात सामूहिकपणे लढा

कोरोना उपचारासाठी लागणारे रेमिडीसेवेर हे औषध तसेच ऑक्सिजन सिलिंडरची देशात कमतरता आहे. राज्य सरकारांकडे आज निधीची कमतरता असून त्याची अनेक कारणे आहेत. एकीकडे राज्याचे उत्पन्न घटलेले असताना केंद्राकडून मिळणारा जीसीटी अद्याप मिळालेला नसल्याकडे लक्ष वेधत प्रफुल्ल पटेल यांनी कोरोनाविरोधातील लढा सामूहिकपणे लढण्याचे आवाहन केले.

सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रावर भाजप सूड उगवतोय – काँग्रेस

सत्ता गेल्यापासून केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेवर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई- महाराष्ट्राचा अपमान करणाऱया कंगना राणावत हिला भाजपने पाठिंबा देणे हा त्याचाच एक भाग आहे. याबद्दल भाजपने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

उर्मिला मातोंडकरने महाराष्ट्राचे नाव देशात मोठे केलेय, ऍवॉर्ड विनिंग कामगिरी केलीय. मध्यमवर्गातील एक मराठी मुलगी नाव कमावते याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपला तो नसेल. त्यांनी कंगनाच्या बाजूने उभे राहायचे ठरवले असेल तर महाराष्ट्र त्याला निश्चितच विरोध करेल, असे स्पष्ट करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगना राणावत हिने मातोंडकर हिच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेचा निषेध केला.

आपली प्रतिक्रिया द्या