काँग्रेसला मोठ्या सर्जरीची गरज! वीरप्पा मोईलींचा राहुल गांधींना सल्ला

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसला मोठ्या सर्जरीचा गरज आहे, असे सांगत पक्षांतर्गत सर्व स्तरावर निवडणूक घेऊन बंडखोरी मोडून काढली पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र, कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेशाध्यक्षांची कामगिरी अत्यंत वाईट राहिली. त्यामुळे लोकसभेतील पराभवाला त्यांना जबाबदार धरले पाहिजे, राहुल यांना जबाबदार धरले जाता कामा नये, असेही ते म्हणाले.

पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहुल यांनी कायम राहावे. त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. झारखंड, महाराष्ट्र, हरयाणामध्ये होणार्‍या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचा अध्यक्ष कोण असला पाहिजे, यावर चर्चा होण्यापेक्षा या निवडणुकीत योग्य त्या उमेदवारांची निवड करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.