काँग्रेसची भूमिका; ऐक्य अतूट! भाजपने घटनेची मोडतोड केली

672

गुपचूप अंधारात राष्ट्रपती राजवट उठकून शपथविधी उरकणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिली जाणारी घटना आहे, अशी टीका काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी करीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्हा पक्ष आजही एकत्र आहेत, पुढे एकत्र राहतील आणि बहुमत सिद्ध करताना आज बनवलेल्या सरकारचा पराभव करतील असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेना-राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेस नेत्यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी अहमद पटेल म्हणाले की, राज्यपाल महोदयांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणकीस यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे याची कोणतीही खातरजमा केली नाही. चुपचाप आणि रात्रीच्या अंधारात नव्या सरकारला शपथ दिली. त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं असल्याचा वास येत आहे. महाराष्ट्र राज्य घटनेवर विश्वास असणारे राज्य आहे. असे असताना इथेच घटनेची तोडमोड केली जात असल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करीत असून रात के अंधेरे मे जो कांड हुआ है उसकी काँग्रेस आलोचना करती है, असे पटेल म्हणाले. या पत्रकार परिषदेला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस महासचिक वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.

कोणतेही मतभेद नव्हते
तीन पक्ष बैठका घेत होते, त्यात कोणत्याही मुद्यावर विशेष मतभेद नव्हते. साध्या साध्या गोष्टी ठरवायच्या होत्या, पण त्यात विशेष अडचण येणार नव्हती, असे सांगून आज दुपारी बारा वाजता तिन्ही पक्षांची पुन्हा बैठक होणार होती. आणि नंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा काल शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता, अशी माहिती अहमद पटेल यांनी दिली.

एकत्र बसून रणनीती ठरवणार
भारतीय जनता पक्षाला विधीमंडळात शिकस्त द्यायला द्यायला काँग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष समर्थ आहेत. जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष या नव्या सरकारचा पराभव नक्की करू. त्यासाठी रणनीती एकत्रित बसून करणार आहोत, असे पटेल यांनी सांगितले.

सत्ता स्थापनेसंदर्भात विलंब नाही
काँग्रेसकडून सत्तास्थापने संदर्भात कोणताही विलंब झालेला नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जेव्हा-जेव्हा फोन केले, त्याला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तुरंत प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. काँग्रेसकडून विलंब झाल्यामुळे हा घोळ झाल्याचा आरोप अहमद पटेल यांनी फेटाळला. काँग्रेसचे 44 आमदार आहेत, पैकी 42 आमदार सध्या मुंबईत उपस्थित असून दोन आमदार गावी आहेत. काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा पटेल यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या