
राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध आहे. तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग असावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंबंधीचा ठरावही कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर केला आहे. दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली जाणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱयांची बैठक दादर येथील टिळक भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आमदार प्रणीती शिंदे, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, शिरीष चौधरी, संजय राठोड, रमेश बागवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते व एनएसयूआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोदी सरकारच्या विरोधात ठराव
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्र सरकारच्या अनेक धोरणांच्या निषेधाचे ठराव करण्यात आले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी आणलेल्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकरी व शेती उद्ध्वस्त होणार आहे. या कायद्यांमुळे शेतकऱयांना बडय़ा उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या काळ्या कृषी कायद्यांचा विरोध करत असून हे कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष करत राहण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
राज्यात ‘शक्ती’
राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेशातील ‘शक्ती’ कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याचा ठरावही कार्यकारिणीत करण्यात आला.
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीचा ठराव
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागांत शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील शेतकऱयांना सरकारने तातडीने मदत द्यावी असा ठरावही करण्यात आला.


























































