
तालिबानचे परराष्ट्रमंत्री हिंदुस्थानात आले होते. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, परंतु तिथे महिला पत्रकारांना परवानगी नाकारली गेली. असा तालिबानी फतवा हिंदुस्थानात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून भारतीय जनता पक्षाला हिंदुस्थानचा तालिबान करायचा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केला.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला पत्रकारांना तालिबानच्या पत्रकार परिषदेत प्रवेश नाकारणाऱया केंद्रातील भाजप सरकारच्या महिलाविरोधी आणि लोकशाहीविरोधी धोरणांवर टीका केली. स्वतंत्र हिंदुस्थानात महिलांना आदराचे स्थान दिले गेले पाहिजे, काँग्रेसकडून नेहमीच महिलांचा सन्मान केला जातो, असे ते म्हणाले.
आवाज उठवणार
काँग्रेस सरकारने आणलेल्या माहिती अधिकार कायदा कमजोर करण्याचा भाजप सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. विचारलेली माहिती न देणे, माहिती अधिकार आयुक्तांची पदे रिक्त ठेवणे, वैयक्तिक माहिती आहे अशी सबब देऊन माहिती नाकारणे असे प्रकार सुरू आहेत. याविरोधात आवाज उठवून हा कायदा अधिक मजबूत असावा यासाठी प्रयत्न करणार असे ते म्हणाले.
शेतकऱयांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करा
सोयाबीनला 5400 रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र 3200 ते 3700 रुपये दराने खरेदी केले जात आहे, ही शेतकऱयांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱयांवर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतकऱयाचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली. सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.