काँग्रेसमधले बंडोबा जेव्हा झाले थंडोबा

>> तुषार ओव्हाळ

काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष. अनेक नेत्यांनी काँग्रेसशी मतभेद होऊन आपला वेगळा पक्ष काढला परंतु नंतर काही कारणास्तव ते पुन्हा स्वगृही परतले.

नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. शरद पवारांनी वीस वर्षापूर्वी सोनिया गांधीच्या राष्ट्रीयत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. तेव्हा पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा स्वतःचा सवतासुभा मांडला.

पवारांचे हे काही पहिले बंड नव्हते. त्यापूर्वी पवारांनी 1978 साली असेच बंडखोरी करून काँग्रेसचे सरकार पाडले होते आणि मुख्यमंत्री पद मिळवले होते. नंतर राजीव गांधींच्या काळात 1987 साली पुन्हा ते स्वगृही परतले. नंतर जे बाहेर पडले ते पुन्हा स्वतःचा पक्ष काढून. आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस जुन्या काँग्रेस पक्षात विलीनीकरणाच्या वावड्या उठल्या आहेत.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी. प्रणब मुखर्जी इंदिरा गांधीच्या मुशीत वाढले. इंदिरा गांधीचे ते खरे राजकीय वारस होते असे म्हटल्या वावगे ठरू नये. 1984 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी आरूढ झाले. इंदिरा गांधी यांच्या पश्चात प्रणब मुखर्जी हे एक पंतप्रधान पदाचे एक दावेदार होते. नंतर अनेक कारणांनी राजीव गांधी आणि प्रणब मुखर्जी यांच्यात खटके उडाले. प्रणबदाकडील अनेक महत्त्वाची खाती राजीव गांधींनी काढून घेतली. नंतर राजीव गांधींनी प्रणबदांना पक्षातूनच हाकलून लावले. 1987 साली प्रणबदांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पुढे तीन वर्षांनी राजीव गांधी आणि प्रणबदामध्ये मनोमिलन घडले. आणि प्रणब मुखर्जींनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

1991 साली जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा अनेक नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली होती. त्यापैकी एक होते एन. डी. तिवारी. एनडी तिवारी हे काँग्रेसचे मोठे नेते. तिवारी यांनी 1984-85 आणि 1988-89 असे दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषवले. नंतर नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपदही त्यांना मिळाले होते. 1991 साली पंतप्रधानपद हुकल्यानंतर तिवारी नाराज होते. अखेर 1995 साली त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वतःची तिवारी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. नंतर 1996 साली पुन्हा पक्षात परतले आणि काँग्रेसच्या तिकिटावर खासदारही झाले.

आपली प्रतिक्रिया द्या