
देशातील 10 राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 6 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात तेलंगणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि छत्तीसगडमधील नावांचा समावेश आहे.
काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सिंघवी यांना तेलंगणातून उमेदवारी देण्यात आली आहे. सिंघवी यांच्यासह मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वेम नरेंद्र रेड्डी यांनाही तेलंगणातून उमेदवारी देण्यात आली आहे. रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे उपाध्यक्षही आहे.
हरयाणातून कर्मवीर सिंह बौद्ध यांना राज्यसभेचे तिकीट देण्यात आले आहे. अंबाला येथील रहिवासी असलेले कर्मवारी 5 वर्षांपूर्वी हरयाणा सचिवालयातून अधीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते मुलाना मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते, मात्र तेव्हा त्यांना संधी मिळाली नव्हती. आता थेट राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे.
The Congress President Shri @kharge, has approved the proposal for the candidature of the following persons to contest the Rajya Sabha elections as Congress candidates from the states mentioned against their names: pic.twitter.com/5rjufZqpEX
— Congress (@INCIndia) March 5, 2026
हिमाचल प्रदेशमधून काँग्रेसने अनुराग शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर तामिळनाडूतून एम. क्रिस्टोफर तिलक यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्यात आले आहे. तर छत्तीसगडमधून आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फुलो देवी नेताम या देखील पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी फुलो देवी यांच्यावर काँग्रेस नेतृत्वाने विश्वास टाकला आहे.
























































