निवडणूक निकालांनंतर एनडीएतील तेलगु देसम आणि जेडीयू या घटक पक्षांच्या नाकदुऱया काढाव्या लागणाऱया भाजपला आणि मोदी यांना आज काँग्रेसने चांगलेच डिवचले. आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष राज्यांचा दर्जा देण्याचे आश्वासन पूर्ण करणार का, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने पैचीत पकडले आहे. तेलगू देसम आणि जेडीयू यांनी एनडीएला पाठिंबा देऊ केला असला तरी आपल्या अपेक्षांची यादीही उघड केली आहे. आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष राज्यांचा दर्जा देण्याची त्यांची मागणी आहे. भाजप आणि मोदींनीही प्रचारात मोठय़ा थाटात हे आश्वासन दिले होते.
याचसंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. मोदी 3.0 सरकार स्थापन होणार असल्याचा दावा वारंवार केला जात आहे, परंतु यावेळचे सरकार ‘मोदी 1/3 सरकार’ असेल हे सत्य आहे, असा टोला त्यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत लगावला.
मोदींना विचारले चार प्रश्न
रमेश यांनी मोदींना चार प्रश्न विचारले आहेत. 30 एप्रिल 2014 रोजी तिरुपती या पवित्र शहरात तुम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते, जेणेकरून मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येईल. 10 वर्षे उलटून गेली, पण तसे झाले नाही. ते आश्वासन आता पूर्ण होईल का? पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, असे रमेश यांनी म्हटले आहे. मोदी विशाखापट्टणम येथील स्टील प्लांटचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. सर्व पक्षांचा याला विरोध आहे. आता तरी तुम्ही विशाखापट्टणम स्टील प्लांटचे खासगीकरण थांबवाल का, असेही त्यांनी विचारले आहे.
बिहारचे काय करणार?
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देऊन आपले 2014 च्या निवडणुकीतील आश्वासन आणि त्यांचे मित्रपक्ष आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांची दहा वर्षांपासूनची जुनी मागणी मोदी आता तरी पूर्ण करणार का, असा प्रश्नही रमेश यांनी पंतप्रधानांना विचारला. यासाठी मागणी करण्यात आली होती, परंतु पंतप्रधानांनी या विषयावर मौन सोडले नाही, असे ते म्हणाले. राजद, काँग्रेस आणि नितीश कुमार यांच्या ‘महागठबंधन’ सरकारने बिहारमध्ये जात सर्वेक्षण केले आहे. आम्ही देशव्यापी जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली होती आणि नितीशकुमार यांनीही याला पाठिंबा दिला आहे. तुम्ही बिहारप्रमाणे संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन देता का, असे आव्हान त्यांनी मोदींना दिले आहे.