
सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. पुण्यातील सेंट-व्हिनसेंट येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खडकवासला येथील एनडीए अर्थात नॅशनल डिफेन्स अॅपॅडमी येथील पदवी शिक्षण पूर्ण करून भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाले. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते. सहा वर्षे हवाई दलात सेवा केल्यानंतर त्यांनी 1978 मध्ये युवक काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश केला. ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1982 मध्ये कलमाडी पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार होते. त्यानंतर 1988, 1994, 1998 असे 4 वेळा ते राज्यसभेचे खासदार बनले. तसेच 1996, 2004, 2009 मध्ये असे 3 वेळा ते पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस खासदार म्हणून विजयी झाले. याच काळात पुण्याचे ‘कारभारी’ म्हणून ठसा उमटविला. पुणे शहरातील काँग्रेसवर आणि महापालिकेवर त्यांचे दीर्घकाळ वर्चस्व होते.
क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे 1996 पासून तब्बल 16 वर्षे ते अध्यक्ष होते. तसेच एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचे ते 2000 पासून अध्यक्ष होते. याआधी 1987 पासून अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. 2008 मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि 2010 मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे त्यांनी भव्यतेने यशस्वी आयोजन केले. याशिवाय पुणे, बंगळुरू, मणिपूर, पंजाब, हैदराबाद, गुवाहाटी आणि झारखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि 2003 मध्ये अॅप्रह्-एशियन गेम्स यांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले. देशात त्यांनी अॅथलेटिक्स क्रीडा संस्कृती रुजवली आणि हजारो तरुण खेळाडू पुढे आणण्यात मोलाचे योगदान दिले.
पुण्यात विकास प्रकल्प
पुणे शहराचा विकास हा त्यांचा ध्यास होता. बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीची उभारणी, पुण्याला आय.टी. सिटी बनविणे, याबरोबरच विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे उद्योगनगरी, क्रीडानगरी, आय.टी. बी.टी. सिटी, उद्याननगरी, पर्यटननगरी, ऑटो हब आणि महोत्सवांचे शहर बनविण्यात त्यांनी फार मोठे योगदान दिले.
रेल्वेचे बजेट मांडणारे पहिलेच राज्यमंत्री
1995 ते 1996 पर्यंत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते पेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बनले. या काळात रेल्वेची पुणे डिव्हिजन त्यांनी तयार केली व असंख्य लांब पल्ल्याच्या रेल्वे त्यांनी पुण्याहून सुरू केल्या. संसदेत रेल्वेचे अंदाजपत्रक मांडणारे ते एकमेव रेल्वे राज्यमंत्री होते. काँग्रेस संसदीय पक्षाचे 2003-2004 या काळात ते खजिनदारही होते. तसेच 2005 नंतर काँग्रेस संसदीय पक्षाचे ते सेव्रेटरी बनले.
अनुभवी आणि संघर्षातून घडलेला नेता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे. हिंदुस्थानच्या हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱया सुरेश कलमाडी यांनी राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. केंद्रीय मंत्री, ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम पाहिले. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून पुण्याला राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राजकारणात मतभेद, संघर्ष आणि टीका अपरिहार्य असतात. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही मूल्यांशी तडजोड केली नाही. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून लोकांप्रती असलेली जबाबदारी आहे, ही भूमिका त्यांनी जपली.
शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते



























































