भारतमाता, प्रभू श्रीरामांपेक्षा भाजपला मोदी मोठे वाटतात हे संतापजनक – किरण काळे

आपल्या संस्कृतीमध्ये मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाच्या पवित्र भूमीला आपण भारत माता म्हणतो. प्रभू श्रीराम हे देशवासीयांच्या मनामनामध्ये वसलेले आहेत. सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना आहे. भाजपला मात्र भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावण्याचा निंदनीय किळसपणा प्रकार घडला. प्रभू श्रीरामांची घोषणा सुरू असताना त्यांना मात्र ती द्यावीशी वाटली नाही, असे म्हणत भाजपचे हिंदुत्वाचे आणि देशाप्रतीचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

बावनकुळे नुकतेच नगरमध्ये येऊन गेले. यावेळी पत्रकारांसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप राज्यभर चांगलीच व्हायरल झाली. त्याचा राज्यभर निषेध सुरू असताना त्यातच नगर शहर काँग्रेसने आता बावनकुळेंचा वादग्रस्त व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला आहे. सोशल मीडियात तो चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे भाजपला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करण्यापूर्वी हातामध्ये भारतमाता, प्रभू श्रीराम, भारतीय संविधान उद्देशपत्रिकेचे फोटो झळकवत त्यांचा जयघोष काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी दंडाला काळ्या फिती बांधून भाजपच्या विकृत मनोवृत्तीचा काँग्रेसने निषेध केला.

काँग्रेसने उघड केलेल्या व्हिडिओमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत असून मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला सांगत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार नगर शहरात एकदा नव्हे तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे दोन स्वतंत्र व्हिडिओ काँग्रेसने उघड केले आहेत. हा भारतमातेचा, प्रभू श्रीरामांचा अवमान असून त्यामुळे तमाम हिंदूंसह सर्व भारतवासी देश प्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

यावेळी काळेंनी घडल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आमच्या हिंदूंना धर्माच्या नावाने केवळ सत्तेसाठी वापरून घेण्याची भाजपची नीती आहे. हिंदूंसह सर्वांना बरोबर घेत भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेचा विचार जोपासण्याचे काम या देशात केवळ काँग्रेसनेच केले आहे. सत्तर वर्षात काँग्रेसने केलेला देशाचा विकास, उभारलेल्या अनेक कल्याणकारी संस्थांचे केवळ उद्योगपत्यांसाठी काम करणाऱ्या भाजपने अवघ्या नऊ वर्षांमध्ये वाटोळे करत महागाई, बेरोजगारी निर्माण करुन देशवासीयांचे कंबरडे मोडल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

आमच्या हिंदू युवकांना रोजगार द्या
अहमदनगर शहर ही धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रयोगशाळा झाली आहे. बावनकुळे, आ. नितेश राणे यांसारखे वेगवेगळे भाजपचे नेते नगर शहरात वारंवार येतात. हिंदूंच्या भावना दुखावतात. धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात. बाजारपेठेतील वातावरण दूषित करतात. यामुळे व्यापार देखील उद्ध्वस्त आहे. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचा यांनी बट्ट्याबोळ करून टाकला आहे. चौंडीतल्या उपोषणकर्त्यांची साधी भेट सुद्धा बावनकुळेंना जिल्ह्यात येऊन सुद्धा घ्यावीशी वाटली नाही. नगरचे सलोख्याचे वातावरण खराब करण्यापेक्षा नगर शहरातील दहा हजार हिंदू युवकांना रोजगार द्या. टाटा, बजाज, महिंद्रा यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कंपन्या भाजपने आपल्या सत्तेचा योग्य उपयोग करत नगर एमआयडीसीमध्ये आणाव्यात अशी मागणी यावेळी किरण काळेंनी भाजप सरकारकडे केली. हिंदूंनी विशेषतः युवकांनी भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन काळेंनी यावेळी केले.

यांनीच हिंदूंना असुरक्षित केले
आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशात भाजपची सत्ता आहे. कायदे करण्यासाठीच बहुमत त्यांच्याकडे आहे. देशाच व राज्याच गृह खात देखील भाजपकडेच आहे. अस असताना देखील हिंदू मुली गायब होत आहेत. हिंदूंवर अत्याचाराच्या असंख्य घटना देशात घडत आहेत. मणिपूर सारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचे देशभर पडसाद उमटत आहेत. आमच्या हिंदू बांधव, भगिनी, युवकांचे मोठमोठे मोर्चे निघत आहेत. काँग्रेसच्या काळात कधी हिंदू असुरक्षित नव्हते. मात्र जेव्हापासून सर्वत्र भाजपची सत्ता आली आहे तेव्हा पासूनच तमाम हिंदूंच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचा आरोप काळेंनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी पत्रकार परिषदेला मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, अलतमश जरीवाला, अजय मिसाळ, किशोर कोतकर, फैयाज शेख, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.