काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा घोळ संपेना, नाना पटोलेंची दिल्लीत `चक्कर पे चक्कर’

1335

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कोण, हा घोळ अद्यापही मिटलेला नाही. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोर लावला असला तरी, भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेल्या नानांना राज्यातील अनेक कॉंग्रेस नेत्यांची ‘नाना’ असल्याने हा घोळ अधिकच चिघळला आहे. यापूर्वीच्या दोन्ही दिल्ली दौNयात नाना पटोले यांना राहुल गांधींची भेटीची वेळ मिळाली नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नाना पटोलेंना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिल्यामुळे नाखुषीने त्यांनी सुरवातीला ते स्वीकारले. मात्र, विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची महसूलमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर, प्रदेशाध्यक्ष पदाच्या रिक्त होणाNया खुर्चीसाठी नाना पटोलेंनी प्रयत्न चालवले आहेत. त्याचवेळी मूळचे कॉंग्रेसी असले तरी पाच वर्षांसाठी भाजपावासी झालेल्या नानांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासारखे महत्त्वाचे पद देण्यास राज्यातील अनेक नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. खासदार राजीव सातव हेही या पदासाठी प्रयत्नशील असल्यामुळे त्यांचाही नानांच्या नावाला तीव्र विरोध आहे. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्रीही नानांविरोधात मैदानात उतरल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नाना पटोलेंच्या नावाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या लढाईत नाना पटोले एकाकी पडल्याचे चित्र आहे.

पश्चिम महाराष्ट्राला संधी द्या!
आक्रमक स्वभावाचे नाना पटोलेंची व्यक्ती केंद्रित कार्यशैली आहे. त्यामुळे त्याचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो. शिवाय गोंदिया पलीकडे त्यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग नाही. पटोले केवळ एका जिल्ह्यापुरते नेते असल्याचा ठपका त्यांच्यावर त्यांचे राजकीय विरोधक ठेवतात. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याला संधी द्यावी, असा एक सूर कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामुळे निर्णय होत नसल्याने कॉंग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष कधी मिळणार, हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या