
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. त्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवर कारवाई केलेली नाही. आता याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अशाच प्रकरणात कठोर कारवाई करण्यात आली होती, मग मोदींवर कारवाई का होत नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला.
28 डिसेंबर 2020 रोजी सोलापूर जिह्यातील सांगोला मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री, पृषी मंत्री यांनी सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या किसान रेल्वेच्या 100 व्या गाडीचा शुभारंभ केला. त्यावेळी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका व पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू होत्या. हा कार्यक्रम देशभर टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याविषयी प्रफुल्ल कदम या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.