जेव्हा काँग्रेसच्याच रॅलीत राहुल गांधी ‘मुर्दाबादच्या घोषणा’ लागतात

सामना ऑनलाईन। भोपाळ

महागाईच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या हिंदुस्थान बंदच्या रॅलीत एक गंमतीशीर घटना घडली आहे. रॅली दरम्यान उत्साहाच्या भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी झिंदाबाद नंतर चक्क राहुल गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा लगावल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चूक कळल्यावर या कार्यकर्त्यांनी पुन्हा साळसूद पणाचा आव आणत राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. पण तोपर्यंत त्या घोषणेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना येथील नीमच भागात घडली आहे.

महागाईच्या विरोधात काँग्रेसने हिंदुस्थान बंद पुकारल्याने येथील कार्यकर्त्यांनीही रॅलीचे आयोजन केले होते. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. सगळेच कार्यकर्ते उत्साहात होते. त्याचवेळी अचानक गर्दीतील एकाने नरेंद्र मोदी झिंदाबाद, राहुल गांधी मुर्दाबादची घोषणा केली. त्याचे अनुकरण काहीजणांनी केले. पण जेव्हा इतर कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी याबदद्ल इतरांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सावधपणे घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

दरम्यान, या घोषणेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने काँग्रेसला लवकरच आपलं भविष्य कळाल्याचं म्हटल आहे. तर एकाने यांची डोकी काम करत नसल्याची टीका केली आहे.

summary-congress-workers–raise-rahul-gandhi-murdabad-slogans