
मुंबई, ठाणे, भिवंडी येथील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी जेएनपीए ते मुंबई पोर्ट ट्रस्टपर्यंत बार्जद्वारे सागरी मार्गाने कंटेनर वाहतूक करण्याची योजना बारगळली आहे. कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ही योजना केंद्रीय नौवहन मंत्रालयाला गुंडाळावी लागली आहे.
जेएनपीए बंदरातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कंटेनर वाहतुकीमुळे मुंबई, ठाणे आणि भिवंडी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. यामुळे कंटेनर मालाची वाहतूक करणे व कंटेनर इच्छितस्थळी पोहोचवणे अवघड होते. यावर उपाययोजना म्हणून केंद्रीय नौवहन मंत्रालयाने मुंबई, ठाणे, भिवंडी येथील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी जेएनपीए ते मुंबई पोर्ट ट्रस्टपर्यंत बार्जद्वारे सागरी मार्गाने कंटेनर वाहतूक करण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी जेएनपीएच्या शॅलो वॉटर जेट्टीचाही वापर केला जाणार होता. या योजनेंतर्गत कंटेनर साठवण्यासाठी मुंबईत एक मोठे गोदाम विकसित करण्याच्या योजनेचाही समाविष्ट होता.
मुंबई, ठाणे, भिवंडीच्या रस्त्यावरील १ हजार ट्रेलर, ट्रक कमी झाले असते
ही योजना लागू झाल्यावर मुंबई, ठाणे, भिवंडी या गजबजलेल्या व वाहतूककोंडीचा सामना करावा लागणाऱ्या या शहरात दररोज प्रवेश करणाऱ्या ट्रेलर, ट्रकची संख्या एक हजारांहून अधिकने कमी होईल. तसेच शेकडो लहान ट्रक आणि टेम्पोची संख्याही कमी होईल. यासाठी ही योजना लवकरच अमलात आणण्यासाठी मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले होते. मात्र सुमारे सात वर्षांपूर्वी केंद्रीय नौवहन मंत्रालयाने आखलेल्या या योजनेला निविदा प्रक्रियेनंतर कोणत्याही कंपन्यांकडूनच फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, जेएनपीएच्या शॅलो वॉटर बंदराचेही खासगीकरण झाले आहे. यामुळे केंद्रीय नौवहन मंत्रालयाने आखलेली ही योजना अखेर बारगळली आहे अशी माहिती जेएनपीएचे वाहतूक विभागाचे जनरल मॅनेजर गिरीश थॉमस यांनी दिली.































































