ओलिसांची सुटका करण्यासाठी पाच दिवस युद्ध थांबवणार, अमेरिका, इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता करार

इस्रायलकडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात हल्ले सुरूच आहेत. इस्रायलच्या लष्कराने अल शिफा रुग्णालयाच्या तळात हमासचे कमांड सेंटर असल्याचा दावा केला आहे तर हमासने हा दावा फेटाळून लावला आहे. या रक्तरंजित संघर्षात नागरिकांचा बळी जात आहे. रोजच्या रोज हा संघर्ष आणखी टोकाचा होत चालला आहे. याचदरम्यान इस्रायलने युद्धविश्रांती घ्यावी अशी मागणी जगभरातून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओलिसांची सुटका करण्यासाठी अमेरिका, इस्रायल आणि हमास यांच्यात तात्पुरता करार झाल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. त्यानुसार पाच दिवसांसाठी लढाऊ ऑपरेशन थांबवण्यात येणार आहेत.

युद्धविश्रांतीसाठी सहा पानांचा करार झाला आहे. करारातील अटींनुसार हे युद्ध किमान पाच दिवसांसाठी थांबवण्यात येईल. दर 24 तासांनी लहान तुकडय़ांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक ओलिसांना सोडले जाणार आहे. युद्धविश्रांती झाल्यानंतर मानवतावादी दृष्टीने मदत पुरवण्यात येईल.

हिंदुस्थानचे नौदल लाल समुद्रात तैनात

ओमान, एडनचे आखात आणि लाल समुद्रात नौदलाच्या युनिट तैनात आहेत. अॅडमिरल आर हरिकुमार यांनी बंगळुरू येथे सुरू असलेल्या सिनर्जी कॉन्क्लेव्ह दरम्यान ही माहिती दिली. हरिकुमार म्हणाले की, भारत गाझामधील लोकांसाठी आधीच मदत सामग्री आणि मदत पाठवत आहे. आता गाझातील नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे हरिकुमार यांनी सांगितले.

30 हजार नागरिकांनी नेतन्याहूंना घेरले

तेल अविव्हमधून सुरू झालेली रॅली शनिवारी रात्री उशिरा जेरुसलेम येथे पोहोचली. यात जवळपास 30 हजार नागरिकांनी सहभाग घेतला. या नागरिकांनी नेतन्याहू यांच्या कार्यालयाला घेराव घातला. हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांना लवकरात लवकर सोडवण्याची मागणीही केली.

हिंदुस्थानने गाझाला पाठवल्या 32 टन जीवनावश्यक वस्तू

हिंदुस्थानकडून पॅलेस्टिनींसाठी मानवतेच्या दृष्टीने तब्बल 32 टन जिवनावश्यक वस्तू सी-17 या लढाऊ विमानाच्या माध्यमातून मिस्र येथे पाठण्यात आल्या. दुसरीकडे अल शिफा रुग्णालयात अद्याप 25 कर्मचारी, 291 रुग्ण आणि 32 अर्भके असून या नवजात अर्भकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युद्धविरामाची मागणी अनेक देशांकडून होत आहे. गाझा पट्टीतील अल-शिफा रुग्णालय डेथ झोन बनल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. डब्ल्यूएचओने रुग्णालय रिकामे करण्याची योजना आखल्याचे म्हटले आहे.