
राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची बिले थकवून ठेवल्याने कंत्राटदारांमध्ये नैराश्य पसरले असून काही दिवसांपूर्वी हर्षद पाटील या तरुण कंत्राटदाराने शेतामध्येच गळफास घेऊन जीवन संपवलं. याचाच काहीच दिवसांत या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. नागपूरमध्ये पी. व्ही. वर्मा या कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
X वर एक पसोट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “राज्यात शेतकरी आत्महत्या, मालाला हमीभाव, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, कंत्राटदारांची थकीत बिलं, महिलांची सुरक्षा, हे ज्वलंत आणि जातीधर्माच्या पलीकडचे प्रश्न असताना सरकारचं नेमकं याकडंच दुर्लक्ष होतंय. थकीत बिल मिळत नसल्याने सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराने दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केली. तरी हे सरकार जागं झालं नाही आणि आता पुन्हा थकबाकीमुळंच अडचणीत आलेल्या नागपूरमधील पी. व्ही. वर्मा या दुसऱ्या कंत्राटदाराने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. आपापसातच एकमेकांना दाबण्यासाठी राजकीय डावपेचात गुंतलेल्या या सरकारला सामान्य माणसाच्या या प्रश्नांकडं बघायला वेळ मिळणार आहे की नाही?”
ते पुढे म्हणाले आहेत की, “सरकारने किमान जबाबदारीचं तरी भान ठेवावं. पण हे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी चाणक्य नितीची नाही तर माणुसकी नितीची गरज आहे, ती पुढच्या काळात तरी दिसेल का?”