बलात्काराचे समर्थन करणारे ब्राझीलचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

1235

‘मी तुझ्यावर बलात्कार करावा इतकी काही तुझी लायकी नाही’ अशा अर्वाच्च भाषेत ब्राझीलच्या संसदेत महिला खासदाराविषयी वक्तव्य करणारे वादग्रस्त प्रतिमा असलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सोनारो हे यावर्षीच्या हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बोल्सोनारो यांनी अनेकदा बलात्काराचे समर्थन करणारे, लिंग, वर्णभेदी वक्तव्ये केली आहेत. दरम्यान, अशा वादग्रस्त व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्राझीलचे 38 वे राष्ट्राध्यक्ष असलेले बोल्सोनारो हे पूर्वी लष्करी अधिकारी होते. डिसेंबर 2018 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते निवडून आले. जानेवारी 2019 पासून ते ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जी-20 आणि ब्रिक्स समिटच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी बोल्सोनारो यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांचे हिंदुस्थानात आगमन झाले असून, रविवारी राजधानी दिल्लीत होणाऱया प्रजासत्ताक दिन सोहळ्याला ते उपस्थितीत असणार आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थितीत राहणारे बोल्सोनारो हे तिसरे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी 1996 आणि 2004 ला ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे होते.

हिंदुस्थानातील साखर उत्पादकांचाही विरोध
– हिंदुस्थान आणि ब्राझिल हे जगातील प्रमुख साखर उत्पादक देश आहेत. हिंदुस्थानातील साखर उत्पादकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने जेव्हा पावले उचलली तेव्हा ब्राझीलने जागतिक पातळीवर हिंदुस्थानच्या साखर धोरणाला विरोध केला आहे.
– वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये (डब्ल्युटीओ) बोल्सोनारो यांनी हिंदुस्थानविरूद्ध भूमिका मांडली आहे. डब्ल्युटीओच्या नियमांचे उल्लंघन हिंदुस्थान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
– त्यामुळे साखर उत्पादनात हिंदुस्थानचा प्रतिस्पर्धी असणाऱया वादग्रस्त बोल्सोनारो यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यास साखर उत्पादक काही राज्यातील शेतकऱयांचाही विरोध आहे.
– हिंदुस्थान आणि ब्राझिलमध्ये सध्या 7.57 अब्ज डॉलर्स इतका व्यापार आहे. आगामी 3-4 वर्षांत हा व्यापार 25 अब्ज डॉलर्स करण्याचा विचार आहे.

राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांची वादग्रस्त विधाने
– बोल्सोनारो यांनी स्वतःच्या मुलांविषयीही वादग्रस्त विधान केले होते. ‘मला पाच मुलं आहेत. त्यातील 4 मुले आहेत. पाचव्यावेळी मी कमजोर पडलो होतो म्हणून मुलगी झाली.’ बोल्सोनारो यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाली होती.
– बोल्सोनारो यांनी अनेकदा बलात्काराचे समर्थन केले आहे. समलिंगी बाबतही वादग्रस्त विधान केले होते. ‘मला जर दोन पुरूष रस्त्यांत एकमेकांचे चुंबन घेताना दिसले तर मी बेदम चोपून काढेन.’ असे त्यांनी म्हटले होते. निर्वासित हे जगातील मोठी घाण आहे असेही त्यांनी वक्तव्य केले होते.

काय म्हणाले होते…
ब्राझीलच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनी विरोधी पक्षाच्या खासदार मारिया रोझारिओला यांना उद्देशून ‘मी तुझ्यावर बलात्कार करावा, इतकी तुझी लायकी नाही’ असे भयंकर वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद जगभरात उमटले. बोल्सोनारो यांच्यावर टीकेची झोड उठली. या विधानावर माफी मागण्याऐवजी बोल्सोनारो यांनी उलट समर्थन केले. ‘ती कुरूप दिसते म्हणून मी तिच्यावर बलात्कार करणार नाही’ असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या