शिवरायांच्या वेशातील तरुणाला विरोध, वसई भुईकोट किल्ल्यावर जाण्यापासून परप्रांतीय सुरक्षारक्षकांनी रोखलं

नरवीर चिमाजी आप्पा पेशवे यांनी कडवी झुंज देत पोर्तुगीजांना नेस्तनाबूत करत विजय मिळवलेला आणि तब्बल दहा हजार मराठ्यांनी रक्त सांडत वसईचा रणसंग्राम हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे. मात्र हा वस‌ईचा भुईकोट असा ऐतिहासिक वसई किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून चित्रीकरण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात एक तरुण वसई किल्ल्यात एका विशिष्ट दृश्याचे चित्रीकरण करत होता. मात्र त्यावेळी उपस्थित असलेल्या परप्रांतीय सुरक्षा रक्षक ब्रीजेश कुमार गुप्ता याने त्याला तातडीने रोखले आणि चित्रीकरण करण्यास मज्जाव केला. या घटनेनंतर ज्या तरुणाला चित्रीकरण करण्यापासून रोखले, त्याने आपला संताप तीव्र शब्दांत व्यक्त केला. त्याने उपस्थित सुरक्षा रक्षकांना त्यांना मराठी येत नसल्याचा देखील जाब विचारला. त्याचे म्हणणे होते की, किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि पवित्रस्थळी वारंवार अश्लील चाळे, प्री-वेडिंग शूट, डान्स चित्रीकरण आणि उच्छादमस्ती करणाऱ्या तरुणाईकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. मात्र जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याला त्वरित अडवले जाते. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे त्याचा रोष अधिकच भडकला होता.

या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांमध्ये पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठी टीका होत आहे. “किल्ल्यासारख्या ऐतिहासिक ठेव्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि शिस्त पाळण्यासाठी प्रशासन खरोखरच जागे आहे का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.