मोतीलाल नगर पुनर्विकासाचा तिढा; हायकोर्टात उद्या सुनावणी

गोरेगाव येथील मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकासाचा तिढा अद्याप कायम आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या असून मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकांवर सुनावणी ठेवण्यात आली होती, मात्र वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने खंडपीठाने बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. गोरेगावमधील म्हाडाच्या भूखंडावर मोतीलाल नगर वसलेले आहे. या जागेवर तीन हजार 686 बैठी घरे बांधण्यात आली आहेत. मात्र अनेक रहिवाशांनी अनधिपृतपणे घरांचे मजले वाढवले आहेत. या अनधिपृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत 2013 साली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, तर संपूर्ण वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प म्हाडा स्वतःच करणार असल्याने म्हाडाच्या वतीने हायकोर्टात मध्यस्थी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याशिवाय काही मालमत्ताधारकांनी म्हाडाच्या पुनर्वसनाला आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.