
समोरून येत असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची माळ बघून 23 वर्षीय तरुणाला मोह झाला. ही माळ आपल्याला मिळाल्यास चांगले पैसे मिळतील असा विचार डोक्यात घुसला. मग काय क्षणाचा विचार न करता त्याने वृद्धेच्या गळ्यातील ती माळ हिसकावून पोबारा केला. आयुष्यातला पहिलाच गुन्हा करण्यात तो यशस्वी झाला. पण लो.टी. मार्ग पोलिसांनी काही तासांत त्याला गजाआड केले.
शकुंतला टेमकर (75) या वृद्धा चिरा बाजार येथे राहतात. तर प्रभादेवी येथे एका कपडय़ाच्या दुकानात कामाला जातात. शुक्रवारी संध्याकाळी त्या नेहमीप्रमाणे प्रभादेवीहून मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात उतरल्या आणि चिरा बाजारच्या दिशेने पायी जाऊ लागल्या. यावेळी आरोपीने शपुंतला यांच्या गळ्यातली सोन्याची माळ हिसकावली.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम पाटील, प्रशांत कांबळे व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक बाबी व खबऱयांच्या मदतीने आरोपी कोण ते स्पष्ट झाले. पण त्याचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याने त्याला शोधाने कठीण बनले होते. पण तरी पोलिसांनी अचूक माग काढत कपडा बाजारात हमलीचे काम करणारा मुर्तुझ अली शेख (21) याला पडले. त्याने पोलिसांना गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची माळ हस्तगत करण्यात आली.


























































