आता कुपरमध्येही कोरोना लॅब, पश्चिम उपनगरातील रुग्णांना दिलासा

401

मुंबई महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयातही आता कोरोना चाचणी करता येणार आहे. पालिका येत्या  दोन दिवसांत कोरोना चाचणी करण्यासाठी लॅब सुरू करणार आहे.  लॅबमध्ये दिवसाला सुमारे 100 चाचण्या करता येणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील कोरोनाचा संशय असलेल्या सर्वसामान्य रुग्णांना मोफत चाचणी करणे शक्य होणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात कोरोनाचा संशय असल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय पालिका आणि खासगी लॅबमध्ये चाचणी करणे, पालिका रुग्णालयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर हे महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याचबरोबर आता विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात कोरोना लॅब सुरू करण्यात येणार आहे. कुपरमध्ये कोरोना लॅब सुरू केल्यामुळे पश्चिम उपनगरांमधील खासगी रुग्णालयांवर पडणारा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतील कोरोना चाचणीचा खर्च न परवडणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आधी कुपरमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या रुग्णांच्या कोरोना चाचणीचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा, केईएम, हाफकीन किंवा शीव रुग्णालयात पाठवले जात होते. मात्र, कुपरमधील लॅब सुरू झाल्यावर वेळ वाचणार आहेच पण कोरोनाचे जलद निदान आणि जलद उपचार शक्य होणार आहे.

पश्चिम उपनगरांत विशेष करून आर/मध्य, आर/दक्षिण आणि आर-मध्यमध्ये 15 मिनिटांत कोरोनाचे निदान करणाऱ्या अँटिजेन चाचणी सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची योग्य ती आकडेवारी समजणे आणि त्यावर जलद औषधोपचार करणे शक्य होणार आहे. त्याच्या जोडीला आता कुपरमधील लॅब सुरू होणार असल्यामुळे रुग्णांना एकाच वेळी दुहेरी फायदा होणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या