
सामना ऑनलाईन । मुंबई
जमावाकडून होणारी हिंसा हा देशातला एक गंभीर प्रश्न होऊ पाहत आहे. याचं प्रत्यंतर काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना आलं आहे. चोरांनीच त्यांना पकडणाऱ्या पोलिसांवर खोटे आरोप केल्याने जमावाने पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अफवा पसरवण्याच्या आणि पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शिवाजी नगर परिसरात ही घटना घडली. वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस चोरांना पकडण्यासाठी या परिसरात साध्या वेशात फिरत होते. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना या चोरांचं लोकेशन शोधून काढलं आणि थेट त्या चोरांना गाठलं. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आणि त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ लागले. पण, साध्या वेशातील पोलिसांना पाहून त्यांच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी चार जणांच्या त्या टोळीने अफवा पसरवण्याचा बेत रचला. पोलिसांना काही कळायच्या आत त्या चोरांनी ‘हे खोटे पोलीस असून आपलं अपहरण करण्याच्या बेतात असल्याचा’ आरडाओरडा करायला सुरुवात केली.
त्यांचा आरडाओरडा ऐकून तिथे लोक जमा होऊ लागले आणि त्यातल्या काहींनी पोलिसांनाच मारायला सुरुवात केली. ते पाहून उरलेला जमावही पोलिसांवर तुटून पडला. याचा फायदा घेऊन या टोळीतील दोन जण फरार झाले. सुदैवाने गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी तिथे वेळेवर पोहोचली आणि या पोलिसांना जमावापासून वाचवण्यात आलं. या सगळ्या गडबडीत पोलिसांच्या हाती या टोळीतले दोन आरोपी लागले आहेत. त्यांनी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
summary- cops beaten up by mob























































