बाप्पा, केवढी ही महागाई, कोथिंबीर चारशेला जुडी;एक श्रीफळ 55 रुपयांना

कोणत्याही पदार्थांच्या चवीला लज्जत देणारी कोथिंबीरची जुडी थेट 400 रुपये तर प्रसादापासून पूजेपर्यंत लागणारे श्रीफळ थेट 50 ते 55 रुपयांपर्यंत गेल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट कोसळले असून बाप्पाच्या प्रसादासाठी पंचपक्वान्न कसे बनवणार, प्रसाद कसा बनवणार असा प्रश्न निर्माण सर्वसामान्यांसमोर निर्माण झाला आहे.

महागाईने होरपळणाऱ्या जनतेला सणासुदीतही दिलासा मिळाला नाही. मात्र लाडक्या बाप्पाचा उत्सव असल्याने खरेदी तर करावीच लागत आहे. मात्र खरेदीसाठी बाहेर पडलेल्या गणेशभक्तांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव सुरू व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु फुले, हार, अगरबत्ती इथपासून ते श्रीफळापर्यंत बाप्पांच्या चरणी ठेवणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. गणपती बाप्पाच्या पूजेला लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीतसुद्धा सरासरी 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे.

मोदक, मिठाईही महागली

मिठाईपासून मोदकांपर्यंतच्या किमतीही 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गणेशोत्सव आल्याने होलसेल आणि किरकोळ बाजारात श्रीफळाचे भाव वाढले आहेत, असे दादर येथील श्रीफळ विक्रेते राजाराम जंगम यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.