Covid Positive: प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…

जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आहे. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता सेलिब्रिटींमध्येही कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. किरण खेर यांनी 20 मार्च रोजी ट्विटरवर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

किरण यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, अशातच आता त्यांना करोना झाला आहे. किरण यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर त्यांनी त्वरीतच कोरोना चाचणी केली. त्यांनी ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर हे ट्विट केलं आहे. ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी कृपया लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’, असे त्यांनी लिहिले आहे. किरण खेर यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत किरण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

किरण खेर यांना 2021 मध्ये रक्ताच्या कर्करोगचे निदान झाले होते. या संदर्भातील माहिती त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. अभिनयापासून एक वर्ष दूर राहून कॅन्सरशी लढाई जिंकल्यानंतर किरण यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शो मधून परीक्षकाच्या भूमिकेत कमबॅक केले होते. यापूर्वी अभिनेत्री किरण खेर यांनी बर्‍याच चित्रपटात काम केले आहे. ‘देवदास, रंग दे बसंती, मै हु ना सारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे. ‘किरणजी लवकर बऱ्या होऊ दे’ म्हणून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.