आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरं उघडू का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप नेत्यांना टोला

राजकारण सदासर्वदा होत राहील. पण या संकटाच्या काळात सर्वांनीच भान ठेवून जबाबदारीने वागले पाहिजे. आपणच जर बेजबाबदारपणे वागलो तर जनता जबाबदारीने कशी वागेल?

‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जातात हे चांगलेच आहे, आम्हीही त्या देतो. पण केवळ घोषणाच देत नाही तर त्यापलीकडे जाऊन हिंदुत्वाचे रक्षण करणारी शिवसेना आहे हे 92-93 साली दाखवून दिले आहे.

धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत हे ठीक आहे. त्यासाठी राजकारणही सुरू आहे. पण कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. भान राखा, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. मंदिरे तर उघडणारच आहोत, पण आता खरी गरज आहे ती आरोग्य मंदिरांची. ही आरोग्य केंद्रे बंद करून आधी मंदिरे उघडू का, असा खडा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कल्याण-डोंबिवलीतील विविध विकासकामांचे ऑनलाईन लोकार्पण झाले. या वेळी मंदिरांवरून राजकारण करणाऱया भाजप नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावत टोला लगावला.

वंदे मातरम् घोषणेच्या पलीकडे शिवसेनेने हिंदुत्वासाठी काम केले

भाजपने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभरात आंदोलन करताना वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, या घोषणा आपण देतो हे चांगलेच आहे, पण आम्ही केवळ घोषणा देत नाही तर त्यापलीकडे जाऊन हिंदुत्वाचे रक्षण करणारी शिवसेना आहे हे 92-93 साली दाखवून दिले आहे. मला त्या खोलात आता जायचे नाही, पण भारत माता की जय म्हटल्यावर भारत मातेची मुले आरोग्य सेवेअभावी तळमळत असतील तर ती भारत माता तरी काय बोलेल, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. अरे नुसता माझा जयजयकार काय करता तिकडे माझी लेकरे तळमळत आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, औषधोपचार मिळत नाही, त्यांच्या सोयीसुविधांकडे लक्ष द्या, नुसत्या घोषणा दिल्या म्हणजे ती बरी होतील का? त्यांना बरं कसं करायचं ते बघा असंच भारत माता म्हणेल आणि त्या दिशेनेच आपण पावले टाकत आहोत, हे फार महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आज मंदिरे जरी बंद असली तरी अत्यावश्यक असलेली आरोग्य मंदिरे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडत आहोत. त्यासाठी जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

फेरीवाल्यांचा उच्छाद मोडून काढू

ठाण्यातील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बेटे छाटली गेली. या हल्ल्याची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली. ते म्हणाले, ठाण्यात जी दुर्घटना घडली ती पाहिल्यानंतर आता अत्यंत कठोरतेने आणि कडकपणाने कायदा राबवावाच लागेल. तिकडे दया, माया, क्षमा दाखवूच शकत नाही. आपल्या नागरिकांची खास करून माता, भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. फेरीवाल्यांचा उच्छाद हा मोडून काढावाच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या