कोरोनाचे संकट कायमचे जाऊ दे! मुंबादेवी चरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. घटस्थापनेपासून आज राज्यभरातील धार्मिकस्थळांची द्वारे भाविकांसाठी खुली झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकरदेखील उपस्थित होत्या. यावेळी मुंबादेवीचे दर्शन घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊदे असे साकडे राज्यभरातील नागरिकांच्या वतीने मुंबादेवी चरणी घातले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना कोरोनाचे संकट कायमचे दूर होऊ देत अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केल्याचे सांगितले. धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे असे आवाहन करताना त्यांनी राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

गुरुवारी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले आणि कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी करुणा भाकली, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बीड जिह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचे दरवाजे स्वतः उघडत पहाटे सर्वप्रथम दर्शन घेतले.