कुंभमेळा ठरला सुपर स्प्रेडर! शाही स्नानानंतर कोरोनाचा संसर्ग वाढला

ना मास्कचा वापर, ना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, यामुळे उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळा हा कोरोनाचा ‘सुपर स्प्रेडर’ ठरला असून, सोमवारी झालेल्या शाही स्नानानंतर शेकडो भाविकांना संसर्ग झाला आहे. पुन्हा उद्या (दि. 14) होणाऱया  शाही स्नानावेळी लाखो भाविकांची गर्दी उसळणार असल्यामुळे कोरोनाचा आणखी उद्रेक होण्याची भीती आहे.

एप्रिल महिन्यात कुंभमेळ्यात तीन शाही स्नान महापर्व आहेत. सोमवारी पहिले शाही स्नान झाले. उद्या (दि. 14) आणि 21 एप्रिलला पुन्हा शाही स्नान होणार आहे.

गंगामातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही – मुख्यमंत्री रावत

गंगामातेचे आशीर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी जावे. भाविकांची गंगामातेवर श्रद्धा आहे. गंगामातेच्या कृपेमुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी केला आहे. गेल्यावर्षी झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाची तुलना या कुंभमेळ्याशी करून नये. ही तुलना चुकीची असल्याचेही रावत म्हणाले.

‘प्रोटोकॉल’चा बोजवारा

  • देशात दिवसाला कोरोनाचे दिड लाखांवर रुग्ण आढळत  असून त्याचवेळी कुंभमेळा सुरू आहे.
  • कुंभमेळ्यासाठी उत्तराखंड सरकारने ‘प्रोटोकॉल’ ठरविला आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रलयानेही नियमावली जाहीर केली. कुंभमेळ्यासाठी येणाऱया भाविकांनी 72 तासांपूर्वीचा ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक असल्याचे म्हटले. पण कोणत्याच नियमांचे पालन होताना दिसत नाही.
  • सोमवारी शाही स्नानासाठी तब्बल 31 लाख भाविक, साधुंनी गंगेत डुबकी घेतली. एवढय़ा प्रचंड संख्येने लोक एकत्र आले. ना मास्क होता, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले. सोमवारी 349 कोरोना रुग्ण आढळल्याचे हरिद्वारच्या आरोग्य अधिकाऱयाने सांगितले. पण ही संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे.
  • हरिद्वार, डेहराडून आणि तिहारी हे तीन जिल्हे कुंभक्षेत्र आहेत. तिन्ही जिह्यांच्या सीमांवर चाचणी केंद्र उभारली; पण लाखोंची चाचणी कशी करणार? हा प्रशासनापुढे मोठा प्रश्न आहे.
आपली प्रतिक्रिया द्या