पंतप्रधानांचा सचिन, विराट, पीव्ही सिंधू सोबत संवाद, 5 सूचनांचे केले आवाहन

कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान हिंदुस्थान समोर उभे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती पाऊले उचलत आहेत. तसेच सामाजिक संस्था देखील पुढे आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जनमानसात ज्यांची छबी आहे अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी पुढे येऊन जागरूकता निर्माण करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आज त्यांनी क्रीडा क्षेत्रातील 40 प्रमुख खेळाडूंन सोबत व्हिडीओ संवाद साधला.

क्रीडापटुंचे चाहते देशात जगभरात पसरलेले असतात. अनेक लोक त्यांना फॉलो करतात. यामुळे ते जनजागृतीसाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. मोदी म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जगासमोर उभे राहिलेले हे मोठे संकट आहे. ज्यामुळे मोठ्या क्रीडा स्पर्धा जसे की ऑलिम्पिक, विम्बल्डन, यांचे आयोजन देखील पुढे ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत क्रीडापटू समोर येऊन एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा समाजात निर्माण करू शकतात.

क्रीडापटूनी समाजाला 5 संदेश द्यावेत. 1 महामारीशी लढायचे आहे. 2 सोशल डिस्टनसिंग महत्त्वाचे आहे. 3 सर्वांनी सकारात्मक राहायचे आणि दुसऱ्यांना सकारात्मक बनवायचे. 4 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जे योगदान देत आहेत अशा वीरांचा सन्मान करणे. 5 प्रत्येक व्यक्तीने आपापल्यापरीने केंद्र किंवा राज्य सरकार कोरोना सहाय्यता निधी खात्यात मदत करणे. असे संदेश पोहोचवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, कर्णधार विराट कोहली, युवराज सिंग, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, महिला हॉकी संघ कर्णधार रानी रामपाल हे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या