कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्ध्वस्त झालो, आशियाई चॅम्पियन व जिम मालक विक्रांत देसाईचे मनोगत

हिंदुस्थानला आशियाई बॉडीबिल्ंिडग स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देणारा… जिमच्या सहाय्याने असंख्य युवक घडवणारा… मराठमोळ्या विक्रांत देसाईची ही स्टोरी. मात्र कोरोना विषाणूचे संकट आणि लॉकडाऊनमुळे तो उद्ध्वस्त झालाय. दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना त्याने ही खंत बोलून दाखवली. हरक्युलस फिटनेस जिम चालवणाऱया विक्रांत देसाईला आता भविष्याची चिंता सतावू लागली आहे.

– ऑनलाइन मार्गदर्शनापेक्षा यूटय़ूबकडे ओढा
लॉकडाऊनमध्ये इतर खेळांतील खेळाडूंना राष्ट्रीय संघटनांद्वारे फिटनेसचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळत होते. शरीरसौष्ठवात मात्र अशा ऑनलाईन मार्गदर्शनाचा काही फायदा नाही. सुरूवातीचे काही दिवस ऑनलाईन मार्गदर्शनासाठी मागणी होती. पण काही दिवसांनंतर ऑनलाईन मार्गदर्शनासाठी पैसे मोजण्यापेक्षा युट्यूबवर पाहून आम्ही जिम करू असे सांगण्यात आले. तसेच काहींच्या घरी जिममधील साधनं नसल्यामुळे त्यांनीही ऑनलाईन शिक्षणाकडे पाठ फिरवली, असे स्पष्ट मत विक्रांत देसाईने यावेळी व्यक्त केले.

– घर कसे चालवणार?, जिमचे भाडे, लाईटबिल कसे भरणार?
गेल्या तीन महिन्यांमध्ये जिमचा व्यवसाय ठप्प झालाय. अशा परिस्थितीत घरखर्च कसा निघणार, जिमचे भाडे व लाईटबिल कसे भरणार, हे प्रश्न सतावू लागले आहेत. जिममधील साधनांसाठी 20 लाख रूपये खर्च केले होते. त्याचा हप्ताही कापून जात आहे. केंद्र व राज्य सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला हवे. मराठी माणूस धंदा करू लागलाय. मुंबईतील बहुतांशी जिम मालक हे सर्वसामान्य मराठी मुले आहेत. त्यांच्या आर्थिक बाजूकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे विक्रांत देसाईला वाटते.

– अटी, शर्थींसह सुरू व्हायला नको
सध्या जिम सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी अटी, शर्थी लावण्यात येतील. कारण एका तासाला दोनच मुलांना प्रवेश द्या,असे ठरवण्यात आल्यास जिम चालवणाऱयांचे मोठे नुकसान होईल. एसी तर सुरूच ठेवावी लागणार. ट्रेनरलाही पगार द्यावा लागणार आहे. माझ्या जिममध्ये ट्रेनर, रिसेप्शनीस्ट मिळून दहा जणांचा स्टाफ आहे. त्यांना पगारद्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, अशी खंतही विक्रांत देसाई याने यावेळी बोलून दाखवली.

-कुठे आहे फिट इंडिया…
केंद्र सरकारने मोठ्या जोशात ‘फिट इंडिया’चा श्रीगणेशा केला होता. पण ज्या गोष्टीने देशवासी फिट होतील तीच गोष्ट सध्या बंद आहे. ही खेदजनक बाब. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी जिम ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जिमसोबत न्यूट्रीशनची गरज आहे, असे विक्रांत देसाई यावेळी आवर्जून म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या