
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हणजेच गोकूळ डेअरीने ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. डेअरीच्या परिसरातच हा प्लांट उभारून कोल्हापूर जिह्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण केली जाणार आहे. तसेच पुढील तीन वर्षात गोकुळची मुंबईतील दैनंदिन दूध विक्री 15 लाख लिटरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा शाहू शेतकरी आघाडीचे नेते व राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
गोकूळ डेअरीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शाहू शेतकरी आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत गोकूळ ब्रॅण्डचा विस्तार करण्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे. त्यासाठी दूध विक्री आणि वितरणाबाबत महत्वकांक्षी योजना आखली आहे. तसेच गोकुळाला दूध पुरवठा करणाऱया शेतकऱयांना आर्थिक दिलासा देण्यासाठी लवकरच दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. विक्रीविस्ताराबरोबरच उत्पादनांची विक्री ऑनलाईन आणि आधुनिक व्यापार पध्दतीच्या माध्यमातून करत आपले उद्दीष्ट साध्य करण्यावर भर दिला आहे.


























































