
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून या रुग्णाचा 14 दिवसानंतर घेतलेला एक चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली शहरासह जिल्ह्याभरात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्या आहेत. 1 एप्रिलपासून कोरोनाग्रस्त रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. 14 दिवस पूर्ण झाल्यावर केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कोरोनाग्रस्त रुग्णाचे चार तासाच्या अंतराने दोन थ्रोट स्वाब नमुने घेऊन तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा तपासणी अहवाल बुधावारी मिळाला असून तो कोरोना निगेटिव्ह आला आहे. मात्र, दुसरा अहवाल अद्याप प्रलंबित असून या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
हिंगोली जिल्ह्यात एकुण 43 संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 42 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका पॉझीटिव्ह रुग्णाचा अहवालही बुधवारी निगेटीव्ह आला आहे. परराज्यातून आलेल्या दोनजणांना बुधवारी वसमतच्या शासकीय विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या दोघांचा अहवाल प्रलंबित आहे. वसमतला एकूण 12 जणांना शासकीय विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

























































